उत्तरेस भाईंदर, दक्षिणेस वांद्रे आणि ईशान्येस ठाणे असे चारी बाजूंनी पाण्याने वेष्ठित एक त्रिकोणी बेट होते. त्यात सहासष्ट गावे होती, म्हणून त्यास साष्टी म्हणत. साष्टी प्रांतात त्यावेळी पाठारे क्षत्रिय समाजाची मोठी वस्ती होती.
बिंबराजाबरोबर तेराव्या शतकात मराठवाड्यातून ज्या काही क्षत्रिय जाती उत्तर कोकणात आल्या त्यापैकी ही एक जात. इ.स. 1534 ते 1739 अशी सुमारे दोनशे पाच वर्षे उत्तर कोकणात पोर्तुगिजांची सत्ता होती.
उत्तर फिरंगाण असेही त्यास म्हणत. पोर्तुगिजांची सत्ता असताना फार मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले. हिंदूंची एकही जात या धर्मांतरातून सुटली नाही. साष्टीतील पाठारे क्षत्रिय जातीतील खूप लोक सक्तीने बाटवले गेले.
1580 ते 1590 या काळात तर ख्रिस्ती मिशनरयांनी गावेच्या गावे बाटवली. धर्मांतराच्या भीतीने जे गाव सोडून जंगलात गेले, डोंगरात लपले व धाड ओसरताच परत घराकडे आले ते वाचले.
काही पोर्तुगिजांच्या भीतीने गाव सोडून मराठी मुलखात जाऊन राहिले. ते धर्मांतराच्या संकटांतून वाचले. त्या पाठारे क्षत्रिय जातीतले हे गंगाजी नाईक.
बाळा नाईक नावाचे पुरूष हे गंगाजींचे पूर्वज. ते वांद्र्याचे वतनदार होता. मातीतील प्रतिष्ठित व श्रीमंत. धर्मांतराचा वरवंटा वांद्रे गावावर फिरला.
एकही हिंदू बाटवायचा ठेवला नाही. 1580 ते 86 तील ही गोष्ट आहे. बरोबर नेता येईल इतके सामान बरोबर घेऊन घरातील माणसांना बरोबर घेऊन बाळा नाईक एका रात्री निसटले.
रात्र अंधारी होती. बंदरावर आला. वांद्र्याच्या खाडीत बरेच मचवे नांगरून ठेवले होते. त्यातील एका मचव्यात सर्व चढले. खुंटीला बांधलेली मचव्याची दोरी तोडली व त्या काळोखात खाडीतून मचवा वल्हवित सारे जण ठाण्यास आले.
ओहोटी सुरू झाली होती. मचवा तिथेच टाकून सामानासह सारी जण खाली उतरली व खाडीचे पात्र पायाने तुडवित कळवे गावात आली. पोर्तुगिजांची हद्द ठाण्यापर्यंत होती.
आता नाईकमंडळी फिरंगणाबाहेर होती. धर्मासाठी बाळा नाईकाने घरादाराचाच नव्हे, तर जन्मभूमीचाही त्याग केला होता. सुरूवातीस वर्ष-दीड वर्षं बाळा नाईक कळव्यास राहिले आणि नंतर जवळच असलेल्या अणजूर गावी स्थायिक झाले.
वांद्र्याचे वतनदार नाईक अणजूरकर नाईक झाले. एकट्या वांद्रे गावात त्यावेळी सहा हजार हिंदू बाटवले होते. त्यात पाठारे क्षत्रिय जातीच्या मागे पोर्तुगीज हात धुऊन लागल्याने धर्मांतरात त्यांची संख्या सर्वात जास्त होती, अशी नोंद ऐतिहासिक कागदपत्रांत सापडते.