अणजूर हा गाव फार पुरातन आहे. ठाणे जिल्हातील भिवंडी तालुक्यातील मुंब्राच्या खाडी समोर झाडीत लपलेले गाव. ह्या गावात नाईकांच्या पुरातन माडीत गंगाजी नाईक यांनी श्रींच्या मूर्तीची स्थापना केली. इ. स. १७१८ मध्ये गंगाजी नाईक ईश्वरी अधिष्ठानासाठी मोरगाव येथे रवाना झाले. एकवीस दिवसांच्या दिवसांच्या निराहार अनुष्ठानानंतर गणरायांनी दृष्टांत देऊन गंगाजींना चिंचवडला जाण्याचा आदेश दिला. तिथे पुज्य संत श्री. मोरया गोसावींचे नातू श्री. नारायण महाराज यांनी आपला वडील मुलगा श्री. चिंतामणी (दुसरे) यांच्याकरवी गंगाजींना अनुग्रह दिला. श्री. चिंतामणी देवांनी आपल्या पूजेतील उजव्या सोंडेच्या श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती भेट दिली. या प्रसाद मूर्तीची स्थापना गंगाजींनी आपल्या अणजूरच्या निवासस्थानी इ. १७१८ मध्ये केली. हिच मूर्ती आज “अणजूरचा श्री सिद्धिविनायक” या नावाने सुप्रसिद्ध आहे .