अणजुरच्या नाईक घराण्याचे मूळ आडनाव राणे असे होते. बिंब राजाने हा गांव इ.स.११६३ साली अंकुश देव राणेला दिला. ह्या घराण्यात पहिल्यापासुन क्षात्रतेज होते. बिंब राजाच्या वंशजापैकी एका राजपुत्रास व त्याच्या आईस राणे घराण्यातील एका पुरुषाने प्राणघातक संकटातून वाचविले .त्यानंतर या घराण्यास नाईक ही मानाची पदवी बहाल करण्यात आली व राणेचे नाईक घराणे झाले. याच घराण्यातील एक निंबाजी नाईक पक्के धर्मप्रेमी होते. त्या कालखंडात इ.स.1580 नंतर साष्टी प्रांतात फिरंगी हिंदुंवर - अनन्वित अत्याचार करुण बाटवाबाटवी करीत हॊते. त्या विरूध्द निंबाजीनी मोठा लढा दिला.
त्यांना मदत हवी होती म्हणून त्यांनी प्रल्हाद जोशी नावाच्या व्यक्तिला संभाजी महाराजांकडे पाठवले दरम्यान संभाजी महाराजांवर आपत्ती आली व महाराष्ट्रात धामधूमीचा काळ सुरु झाला. यामध्ये निंबाजी नाईकाचे धर्मकार्य अर्पुण राहिले व त्यांचे इ.स. 1718 ला निधन झाले तरी त्यांच्या घराण्याच्या क्षात्रतेजाची परंपरा चालूच राहीली त्यांना दोन पत्नी होत्या. पहिल्या पत्नीपासून शामजी तर दुस-या पत्नीपासुन सहा अपत्ये गंगाजी, बुबाजी, मुरारजी, शिवजी, नारायणजी व एक कन्या झाली. त्यातील गंगाजींनी पोर्तुगीजांना शह देण्याचा बेलभंडारा उचलला. गंगाजींने आपल्या पाच भावांना कार्यप्रवृत्त केले.
परंतु, "सामर्थ्य आहे चळवळीचे | जो जो करील तयाचे | परंतु आधी भगवंताचे अधिष्ठान पाहीजे ||" ह्या समर्थांच्या आदर्शाप्रमाणे चळवळीची सुरुवात करण्यापूर्वी प्रथम ईश्वरी अधिष्ठानासाठी गंगाजी इ.स.१७१८ ला मोरगाव येथे रवाना झाले. मोरगावचा मयुरेश हे त्याचे कुलदैवत अणजूर ते मोरगाव हे चालत अंतर सुमारे 143 मैल (अंदाजे 230 की.मि.) आहे. हा काळ जवळ जवळ 284 वर्षांपूर्वीचा खराब रस्ता डोंगर, जंगल व दरोडेखोरांचे अडथळे पार केल्याशिवाय ओलांडणे अवघडच होते. त्यांनी बरोबर एक जुना शेला, धोतर, मुंडासे, अर्धा रुपया व पुजेचे साहित्य घेऊन वाटचाल केली. ते कर्जत, खंडाने, चिंचवड, पुणे, जाधवांची वाडी, वाघॊली, जेजुरी रस्त्याने मोरगावी पोहचले. वाटेत दमाजी थोरतांच्या बेरडांनी होते नव्हते ते सारे लुटुन नेले. घनदाट अरण्यात ते रस्ता चुकले. त्यावेळी त्यांना एका महार गृहस्थाने मोरगांवपर्यंत पोहचते केले. हा सात दिवसांचा प्रवास त्याचा निराहार होता. मोरगावातही त्यांना पुढे चौदा दिवस निराहार व्रत केले. एकवीस दिवसांच्या अनुष्ठानानंतर गणरायांनी दृष्टांत देऊन गंगाजींना चिंचवडला जाण्याचा आदेश दिला. पारणे फेडून ते चिंचवड येथे आले. तिथे पुज्य संत श्री मोरया गोसावींचे नातु श्री. नारायणदेव महाराज यांनी आपला वडील मुलगा श्री चिंतामणी(दुसरे) यांच्याकरवी गंगाजींना अनुग्रह दिला. श्री चिंतामणी देवांनी आपल्या पुजेतील उजव्या सोंडेचा श्री सिध्दिविनायक तर श्री नारायण महाराजांनी गंगाजीना एक तलवार भेट दिली. तलवार पुढे कुठे गेली याचा उल्लेख नाही.( ह्या बाबतीत अशीही आख्यायिका आहे की गंगाजी नाईक ज्यावेळी चिंचवडला पोहचले त्यावेळी श्री. नारायण महाराज देवस्थानच्या पाठीमागून वाहत असलेल्या पवना नदीत स्थान करीत होते. त्यांनी गंगाजीना पहताच आपण आलात तर असे म्हणुन पाण्यातून एक धोंडा काढला तोच उजव्या सोंडेचा गणपती दिसला व हा श्री सिध्दिविनायक आपले कार्य पुर्णत्वास नेईल आसा आर्शीवाद देऊन त्यांच्या हातात दिला. श्री गणेश पंचपदी बखर 1895) गंगाजीना अत्यंत आनंद झाला. तृप्त व प्रसन्न चित्ताने ते अणजूरला परत आले.
घरी येताच त्यांनी या ईश्र्वरकृपेची साद्दंत हकीकत आपल्या भावंडाना सांगितली व या प्रसाद मूर्तीची स्थापना इ.स 1718 मध्ये चंपासष्टीच्या दिवशी फिरंग्यांच्या आमदानीत बांधलेल्या नाईकांच्या माडीत करण्यात आली. अणजूर गावाला तिन्ही बाजूंनी पाणी असुन ठाणे, भिवंडीला जाण्यासाठी रस्ता जोडलेला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या अणजूर गावी जवळजवळ तीनशे वर्षापुर्वीची चुना व दगड यांनी बांधलेली ही नाईकांची माडी आहे. त्या माडीतील एका मोठ्या खोलीत एक मोठे लाकडी मखर असून त्यात एका सुंदर आकर्षक पितळेच्या देव्हा-यात ही प्रसादमुर्ती आसनस्थ आहे. या नाईकांच्या माडीला पुर्वी तटबंदी होती, मागे घडीव दगडांनी बांधलेली मुलगय नावाची पुष्करणी (तळे) आहे. ह्या ऐतिहासिक वास्तु व त्यामधील देवखोलीवर भाग कालमानाने मोडकळीस आला होता. अशा ऐतिहासिक वास्तुचे व त्यामधील देवस्थानचे जतन करण्याकरीता नाईक कुटुंबाच्या मंडळींनी एक जिर्णोध्दार समीती सन 1984 ला स्थापन केली .